पोलीस भरतीत बनवेगिरीचे औरंगाबाद “कनेक्शन”

पुणे- पोलीस भरती परीक्षेवेळी मूळ उमेदवारांच्या जागी तीन तोतया उमेदवार परीक्षा देत असल्याचे उघडकीस आले होते.याप्रकरणी पोलिसांनी एकूण 7 आरोपींना अटक केली असून ते सर्वजण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. डमी उमेदवार बसवून परीक्षा पास करण्याच्या बोलीवर 5 लाख रुपये घेतले जात असल्याची बाब प्राथमिक तपासत समोर आली आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बाबासाहेब गवळी (22), सूरज भोपळावत (27, दोघे रा. सांजखेडा, ता.पैठण) यांना अटक केली आहे. तर सिंहगड पोलिसांनी रामेश्वर गवळी रा. घारेगाव ता. पैठण), शामराव भोंडणे (रा. मालेगाव, वाशिम), महेश दांडगे (रा.भराज बु.ता.जाफराबाद), विठ्ठल जारवाल (रा.पिंपळगाव, औरंगाबाद), जनक सिसोदे (रा. नागोन्याची वाडी, औरंगाबाद) यांना अटक केली आहे.
आरोपींनी पोलीस भरती लेखी परीक्षेत मूळ परीक्षार्थी उमेदवारास चांगल्या मार्काने उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षार्थीचे हॉल तिकीट, पॅनकार्ड, आधारकार्ड व मतदान ओळखपत्र देत मास्क वापरत स्वत:ची ओळख लपवली. यादरम्यान तपासणीदरम्यान डमी परीक्षार्थी म्हणून ते आढळून आले.
असे चालते रॅकेट
परीक्षा दिल्यानंतर आरोपींना 1 लाख, तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 4 लाख रुपये असे उमेदवारामागे देण्याचे ठरले होते. मूळ उमेदवार आणि तोतया परीक्षार्थी यांची सांगड घालण्यासाठी औरंगाबाद, जालना परिसरात रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या तोतया उमेदवारांपैकी काहींनी यापूर्वी “एसआरपीएफ’ची परीक्षा दिलेली असून त्यात त्यांना चांगले गुण मिळालेले आहेत. त्यामुळे परीक्षा पास होण्याची खात्री देत हे पैसे उकळले जात होते.
पोलीस भरती प्रक्रियेत तीन डमी प्रकार उघडकीस आले असून, त्यामागे नेमके कोण आहे याचा तपास सुरू आहे. पकडलेले तोतया उमेदवार कशाप्रकारे गुन्ह्यात वापरण्यात येत होते? त्यांची पार्श्वभूमी काय? इतर साथीदार कोण? यासंर्दभात चौकशी सुरू आहे. सदर प्रकरणी दोन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
– रवींद्र शिसवे,
सहपोलीस आयुक्त





