Aundh News – औंधसह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी एक महिला म्हणून 25 वर्षात जे काम करता आले ते आपल्यासाठी प्रेरणादायी असून यापुढील काळात महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी उद्योगधंदे उभारण्याचा आपला मानस आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. औंध येथे राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा स्मृतिचिन्ह, रोप, शाल, श्रीफळ देऊन सौ. सुजाता राजेघाटगे व मित्रपरिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सौ. सुजाता राजेघाटगे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक वैभव राजेघाटगे यांच्या पत्नी आहेत. यावेळी पंचायत समिती सदस्य शुभम शिंदे, मनोज देशमुख, पुण्याचे नोंदणी विभागाचे उपसंचालक अविनाश देशमुख, डॉ. नलवडे, डॉ. कोडम, डॉ. व्ही. टी. जाधव, सौ. माने, सौ. बाबर, सौ.कोडम, विश्वस्त हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, माजी सरपंच सोनाली मिठारी, शुभांगी हरिदास, उषा माने, पुजारी, शीतल देशमुख, प्रज्ञा कुंभार, यादव, सचिव प्रदीप कणसे, सहसचिव संजय निकम, दीपक कर्पे, प्राचार्य डॉ. श्रीकांत भंडारे, सदाशिव घाडगे, सौदामिनी सांगलीकर, मुख्याध्यापक अमोल यादव, उपमुख्याध्यापक अरुण घार्गे, देवीदास घार्गे व मान्यवर उपस्थित होते. गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी म्हणाल्या, ‘‘औंधचा ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक वारसा जपण्यासाठी यापुढील काळातही प्रयत्न करणार आहे. श्री यमाई देवीचे आशीर्वाद ,पाठबळ कायम आपल्या पाठीशी राहिले आहे. महिलांनीही आज पुढाकार घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांत आपले नाव कमवावे, असे आवाहन गायत्रीदेवी यांनी केले. यावेळी सौ. सुजाता राजेघाटगे म्हणाल्या, ‘‘गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महिलांनी वाटचाल करावी. यापुढील काळातही औंधच्या महिलांसाठी दिशादर्शक कार्यक्रम राबविणार आहे.’’ गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी कधीही संकटांची भीती बाळगली नाही. समाजाच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहणे हा त्यांचा स्वभाव गुण आहे. डॉ. श्रीकांत भंडारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रमोद राऊत यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव संजय निकम यांनी आभार मानले.