Atul Save : ज्यांना युतीत रहायाचे आहे, त्यांनी रहावे; मंत्री अतुल सावेंनी दिला इशारा

नांदेड : तांडा वस्ती सुधार निधीवरून शिंदेसेनेच्या आमदाराने नाराजी व्यक्त करत थेट नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांना खरमरीत पत्र पाठवून इशारा दिला होता. त्यावर मंत्री अतुल सावे यांनी प्रत्युत्तर देत शिंदेसेनेच्या आमदाराला थेट इशारा दिला आहे. पाच वर्ष आमच्याकडे २३७ आमदार आहेत, आम्ही युतीत काम करतो, ज्यांना युतीत राहायचे त्यांनी राहावे… ज्यांना नसेल राहायचे ते बाहेर पडतील, अशी प्रतिक्रिया अतुल सावे यांनी नांदेडमध्ये दिली. महायुतीच्या आमदारांनी तांडा वस्ती निधी वरून नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री अतुल सावे मंगळवारी नांदेडला आले होते.
नांदेड जिल्ह्यातील हदगावचे शिंदेसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उघड नाराजी व्यक्त करत मंत्री अतुल सावे यांना खरमरीत पत्र लिहिले होते. तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधीबाबत अनेक पत्रव्यवहार करूनही मंजुरी न देता पक्ष विरोधी लोकांना मंजुरी दिली. ही गंभीर बाब असून नांदेड दौऱ्यावर आल्यावर याबाबत असंख्य कार्यकर्ते घेऊन जाब विचारणार असा इशारा कोहळीकर यांनी पत्रात दिला होता. त्यावर मंत्री अतुल सावे यांनी देखील शिवसेना आमदाराला प्रत्युत्तर दिले आहे.
विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीवरून महायुतीचे काही आमदार नाराज असल्याचे चित्र आहे. भाजपचे आमदार तुषार राठोड आणि आमदार भीमराव केराम यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री अतुल सावे यांची तक्रार केली होती, त्यांनतर मुख्यमंत्री फडवणीस यांनी मुखेड कंधार या दोन तालुक्यातील ७ कोटी २५ लाख रुपयाच्या कामांना स्थगिती दिली. शिवाय आमदार बाबुराव कोहळीकर यांनी देखील आक्षेप व्यक्त करत महायुतीला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेना आमदाराला थेट इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा बनला आहे.





