महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघातील भविष्य निर्वाह निधीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी तपास सीबीआयकडून सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. याबाबत सदस्य चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सावे म्हणाले, वरिष्ठ सामाजिक सुरक्षा अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या अधिपत्याखालील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे अधिकृतपणे एफआयआर दाखल करण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. नुकसानभरपाईसाठी समिती गठीत – शंभूराज देसाई कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदानाच्या धोरणासाठी अपर मुख्य सचिव (मुख्यमंत्री सचिवालय) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाच्या तक्रारी लक्षात घेता, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून समिती गठीत करण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. याबाबत किशोर जोरगेवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. देसाई म्हणाले, कोळसा वाहतुकीमुळे होणारे पिकाच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने अतिरिक्त मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री सचिवालय यांच्या अध्यक्षतेखाली एक सहा सदस्यांची समिती यवतमाळ जिल्ह्यासाठी गठीत करण्यात आली. याच धर्तीवर चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी समिती गठीत करण्यात येईल. ही समिती तीन महिन्यात या नुकसान भरपाई संदर्भात विभागाला अहवाल सादर करेल या समितीचा अहवाल सादर करताना त्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा देखील विचार करण्यात येईल.