मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात याबाबतच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांनी ईडीची ही कारवाई योग्यच असल्याचं म्हंटलं आहे तर दुसरीकडे शिवसेना व महाविकास आघाडीतील नेत्यांनी ही कारवाई राजकीय आकसापोटी असल्याचा आरोप केला आहे. अशातच आणता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्या घरी पडलेल्या ईडीच्या धाडीवर भाष्य करताना राऊत यांना अटक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर भातखळकर यांनी याबाबतची भूमिका मांडली. ते लिहतात, “करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय. आणि इथे शिवीगाळ करून उपयोगही नाही…. ईडीवाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत.”
भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये राऊत यांच्या ट्विटचा एक स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. ईडीने राऊतांच्या मैत्री निवासस्थानी धाड टाकल्यानंतर राऊत यांनी ट्विटरवर भूमिका मंडळी होती. यामध्ये त्यांनी, बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत ही कारवाई खोटी असल्याचा दावा केला होता. त्यांच्या याच ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत भातखळकर यांनी, ‘ईडीवाले ट्विटर वाचत नाहीत’ असा टोला राऊतांना लागावला.
करेक्ट कार्यक्रम सुरू झालाय. आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही….
ED वाले ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत.
घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत. pic.twitter.com/6r8CHkUCJL— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 31, 2022
राऊत यांच्यावरील कारवाईचा आनंद – संजय शिरसाट
“ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
राऊत कदमांच्याही निशाण्यावर
बंडखोर गटाचे नेते रामदास कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांनी ईडी कारवाईवर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देताना, बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत ही कारवाई खोटी असल्याचं म्हंटलं होत. कदम यांनी हाच धागा पकडत, राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये त्यांनी शरद पवार यांची शपथ घ्यावी असा टोला लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
अरविंद सावंत म्हणतात…
दरम्यान, राज्यपालांच्या महाराष्ट्राबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.