नवनीत राणांच्या पत्राची दखल! लोकसभा अध्यक्षांनी अहवाल सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली – नवनीत राणा यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप करण्यात केला आहे. या कोठडीतील वागणुकीबाबत नवनीत राणांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. या पत्राची तातडीने दखल घेत 24 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या रिपोर्ट आधारे नोट द्यावी, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला याबाबत उत्तर द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवनीत राणांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत पत्र लिहिले आहे. जेलमध्ये आपल्याला अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. 23 तारखेला रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये पाणीही देण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, कारण मी अनुसूचित जातीची आहे. त्यामुळे मला पाणी पिण्यासारखा मुलभूत हक्कही नकारण्यात आला, असा गंभीर आरोप राणांनी पत्राद्वारे केला आहे.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरूनच पोलिसांनी अटक केल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. यामुळे पोलीस आयुक्त, एसीपी आणि डीसीपी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील नवनीत राणांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.





