Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे बीड कनेक्शन उघड; ‘त्या’ पत्रातून धक्कादायक माहिती आली समोर
नाशिकच्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) यांच्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणात आता बीड कनेक्शन समोर आले आहे.

Ashok Kharat : नाशिकच्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) च्या लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या प्रकरणात आता बीड कनेक्शन समोर आले आहे.
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात अडकलेल्या खरातकडे बीडमधील महिलांना पुत्र प्राप्तीसाठी समुपदेशनाच्या नावाखाली पाठवले जायचे, असा धक्कादायक दावा एका निनावी पत्रातून करण्यात आला आहे. या पत्रामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
पत्रातील गंभीर आरोप
बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या एका महिला नेत्याला (Ashok Kharat) पाठवण्यात आलेल्या या पत्रात खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. पत्रानुसार, बीडमधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा प्रकार चालत होता. राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या कृपेने आणि वरदहस्ताने बीडमधील महिलांना अशोक खरातकडे समुपदेशन आणि पुत्रप्राप्तीसाठी पाठवले जायचे.
तसेच बीडमधील काही डॉक्टरांकडून गर्भलिंग निदान (सेक्स डिटर्मिनेशन) केले जात असल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेला स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा होता, असे पत्रात म्हटले आहे. हे आरोप खरे ठरल्यास प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित न राहता, अंधश्रद्धा, फसवणूक आणि कायद्याचे उल्लंघन यांच्याशी जोडले जाऊ शकते.
शरद पवार गटाची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी या पत्राची दखल घेत कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की,
– पत्राची सत्यता तपासून पोलिस अधीक्षकांनी सुमोटो दाखल करावा.
– हे प्रकरण एसआयटीकडे सोपवावे.
– संबंधित सर्व व्यक्तींना ताब्यात घेऊन कसून चौकशी करावी.
– पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी त्वरित कारवाई व्हावी.
हेमा पिंपळे म्हणाल्या, “बीडमधील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा प्रकार चालत होता. याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. लिंग निदान आणि महिलांचा शोषण यासारख्या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”
परळीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निदर्शने
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या निषेधार्थ परळी तहसील कार्यालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या वतीने मोठे निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी खरातवर कठोर कारवाई करण्याची आणि त्याला अभय देणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली. “भोंदूबाबाला फाशी द्या!” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तहसीलदारांना निवेदन देऊन जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
अशोक खरात (Ashok Kharat) यांच्यावर नाशिकसह राज्याच्या विविध भागांत शेकडो महिलांचे लैंगिक शोषण, अंधश्रद्धा पसरवणे आणि फसवणूक केल्याचे आरोप आहेत. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एसआयटी तपास करत आहे. आता बीड कनेक्शन समोर आल्याने प्रकरण आणखी विस्तारले आहे. या प्रकरणात पोलिस तपास सुरू असून, पत्रातील दाव्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.






