Private bus fare hike : पालकांनो लक्ष द्या! खाजगी स्कूल बस दरात झाली ‘इतकी’ वाढ; ‘या’ तारेखेपासून नवी दरवाढ लागू केली जाणार

मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वी एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. ही दरवाढ कमी करण्यात यावी किंवा थांबवावी यासाठी अनेक संघटनांकडून निवदने देण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ रिक्षा टॅक्सीचा प्रवास दरांतही वाढ करण्यात आली. आता या पाठोपाठ शालेय बसच्या दरात १० टक्के भाडेवाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या १ एप्रिलपासून ही नवी दरवाढ लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे वाढलेल्या दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागणार आहे.
‘या’ कारणांमुळे भाडेवाढ
मिळालेल्या माहितीनुसार, शालेय बस निर्मिती करणाऱ्या उत्पादकांकडून बस आणि सुट्या भागांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. हे दरवाढ करण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. तसेच बसचा दुरस्ती आणि देखभाल खर्चातही वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि उपाययोजना करणे आवश्यक असते. आदी कारणांमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच १ एप्रिलपासून ही नवी दरवाढ लागू करण्यात केली जाणार आहे.
प्रवाशांवर भुर्दंड सोसण्याची वेळ
मुंबईत रिक्षाच्या प्रवासात ३ रुपयांनी तसेच स्कूल कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे खाजगी वाहनांचा प्रवासही महागला असल्याचे चित्र आहे. सुधारित भाडेवाढीचा तक्ता लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार रिक्षाची प्रवासी भाडेवाढ ११ टक्के आणि टॅक्सीची भाडेवाढ १० टक्के असणार आहे. स्कूल कॅबच्या भाडे दरातही २० टक्के वाढ करण्यात आली आहे. परिणामी प्रवासाठीच्या खर्चांचा भुर्दंड सोसण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.





