तृतीयपंथीयांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न; पोलिसांशी झटापट, फरफटत नेल्याचा ठिय्या मांडणाऱ्यांचा आरोप

पुणे – तृतीयपंथीयांविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत तृतीयपंथी नागरिकांनी मंगळवारी रात्रीपासून आंदोलन छेडले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होत आहे. तर, तृतीयपंथी येथील रस्त्यावर झोपल्याने पोलीस आणि या नागरिकांत झटापट झाली. बुधवारी हा व्हिडिओ व्हायरल झाला.
आमदार राणे यांनी मंगळवारी तृतीयपंथी समुहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर तृतीपंथीयांनी मंगळवारी रात्रीपासूनच आंदोलन सुरू केले. यात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले. राणे यांच्यावर गुन्हा दखल करावा, अशी मागणी केली. मात्र, गुन्हा दाखल होत नसल्याने या नागरिकांनी बुधवारी सकाळी बंडगार्डन चौकातील रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली.
पोलिसांनी त्यांना रस्त्यावरून बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. “माझ्या डोक्याला लागले आहे,’ असे म्हणत असतानाही पोलिसांनी त्यांना उचलून ठाण्यात नेले. सुमारे दीड तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आंदोलनस्थळी पश्चिम प्रादेशिक अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपयुक्त स्मार्तना पाटील यांनी धाव घेतली.
सुषमा अंधारे, सुजात आंबेडकर यांची धाव
या आंदोलनावेळी उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांना पाठिंबा देत गुन्हा दाखल का होत नाही, अशी विचारणा केली. तर, आंदोलक तृतीयपंथीयांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांचा अर्ज मुंबई शहर पोलिसांकडे पाठवत आहोत, असे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले.





