Attempt to Murder : महिला पोलीस अधिकाऱ्याचाच खुनाचा प्रयत्न! खडकी पोलीस वसाहतीतील घटनेने खळबळ
Attempt to Murder : पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत (स्पेशल ब्रॅँच) कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) महिलेवर पतीकडून अमानुष हल्ला.

Attempt to Murder – खडकी बाजार पोलीस वसाहतीत कौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पती योगेश माधव बेरी ( ३८, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक महिलेने खडकी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तक्रारदार पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत (स्पेशल ब्रॅँच) नियुक्तीस आहेत.
आरोपी बेरी हा खासगी कंपनीत नोकरी करतो. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाल्या. गेल्या काही महिन्यांपासून आराेपी पत्नीचा चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. यामुळे पत्नीने घटस्फोटाचा दावा शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात दाखल केला होता. त्या खडकी बाजार पोलीस वसाहतीतील अधिकारी निवासस्थानात राहायला आहेत. गेल्या काही दिवसांपासून पती वेगळा राहत होता.
वसाहतीतील घराची चावी दोघांकडेही होती. २७ मे रोजी रात्री साडेनऊला पत्नी घरी परतली तेव्हा पती घरात लपून बसला होता. आरोपीने पत्नीच्या डोळ्यात राख फेकली. ओढणीने त्यांचा गळा आवळला. त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा आसपासच्या रहिवाशांनी तेथे धाव घेतली आणि पतीला पकडले. त्यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खुनाचा प्रयत्नबद्दल पतीला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे तपास करत आहेत.





