लखनौ – बॉलिवूड अभिनेते मुश्ताक खान यांच्या अपहरणाचे प्रकरण समोर आल्यानंतर आता, उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ज्या टोळीने मुश्ताक खान यांचे अपहरण केले होते, त्याच टोळीने प्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांचेही अपहरण करण्याचा कट आखला होता. या टोळीने शक्ती कपूर यांना एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ५ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांचे अपहरण करण्याचा टोळीचा प्रयत्न होता. पण, शक्ती कपूर यांनी पाच लाख रुपयांचा प्रस्ताव अमान्य केल्याने हा कट फसला. या टोळीचा दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याच्या अपहरणात सहभाग होता का, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या टोळीतील सदस्यांनी कथितपणे अभिनेते मुश्ताक खान यांचे दिल्ली विमानतळावरून अपहरण केले होते. त्यानंतर त्यांनी मुश्ताक खान यांना उत्तर प्रदेशातील बिजनौरला नेले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केले. या संपूर्ण प्रकरणाबाबत बिजनौरचे पोलीस अधिक्षक अभिषेक झा म्हणाले की, अभिनेते शक्ती कपूर यांना एका कार्यक्रमात बोलवून त्यांचेही अपहरण करण्याचा प्रयत्न होता. यासाठी आरोपींनी शक्ती कपूर यांना ५ लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. पण शक्ती कपूर यांनी मोठी आगाऊ रक्काम मागितल्याने हा प्रस्ताव बारगळला. ही टोळी आणखी काही अभिनेत्यांच्या अपहरणात सहभागी होती का याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे.