संदिपान भुमरेंविरोधात तक्रार देणाऱ्याच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न ! पोलिसात धाव घेत तरुण म्हणाला..

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणाऱ्या तरुणाच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप संबंधित तरुणाने केला आहे. भाऊसाहेब वाघ असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात भुमरे यांनी या तरुणाला फोनवरून शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाघ यांनी भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान, आता आपल्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप वाघ याने केला आहे. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या तक्रारीत वाघ यांनी म्हटले आहे की, 25 जूनला रात्री काळ्या गाडीतून काही लोक माझ्या घरासमोर येऊन त्यांनी दार वाजवले. या लोकांना पाहून मी तत्काळ 112 नंबरला फोन लावला. त्यामुळे हल्ला करण्यासाठी आलेले लोक पळून गेले. दरम्यान, वाघ यांच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिसात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील दरकवाडी गावात बाबासाहेब वाघ नावाचा तरुण राहतो. काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात राहण्यासाठी आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याच्या गावात रस्त्याचे काम सुरू झाले. पण रस्ता न करताच पैसे उचलण्यात आल्याचा आरोप वाघने केला आहे. तर हे काम मंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांचे असल्याचे गावातील लोकांनी सांगितल्याने आपण भुमरे यांच्या मालपाणी नावाच्या पीए यांना फोन करून कामाबद्दल विचारणा केली होती, असे वाघ यांचे म्हणणे आहे.





