ठाणे : राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा आणि राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० (कलम ६७) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ (कलम ३०८) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आमदारांनी स्वत: पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०२४ मध्ये ते त्यांच्या विधानसभा मतदारसंघात असताना एका अज्ञात महिलेकडून त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला त्यांनी या कॉलकडे दुर्लक्ष केले. मात्र, वारंवार कॉल येत राहिल्याने त्यांनी अखेर कॉल उचलला. त्या वेळी महिलेने त्यांच्याशी मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर ती सातत्याने संपर्क साधू लागली. वैतागलेल्या आमदारांनी त्या महिलेचा नंबर ब्लॉक केला. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्या महिलेने पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधला. यावेळी तिने आमदारांना दररोज अश्लील छायाचित्रे पाठवण्यास सुरुवात केली. आमदारांनी तिचा प्रस्ताव नाकारला असता, तिने पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. सुमारे महिन्याभरापूर्वी त्या महिलेने पुन्हा नव्या क्रमांकावरून संपर्क साधत ५ ते १० लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार आपली राजकीय कारकीर्द संपवू शकतो, हे लक्षात आल्यानंतर आमदारांनी तात्काळ ठाणे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हनी ट्रॅपचा वापर करून राजकीय व्यक्तींना लक्ष्य करण्याच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.