Pune District : ‘जलजीवन’ची पाइप पळविण्याचा प्रयत्न; दौंडज येथील ग्रामस्थांची सतर्कता
Pune District : रखडलेल्या जलजीवन योजनेप्रकरणी संबंधित ठेकेदार तसेच तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना रखडलेली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे

वाल्हे : येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात जलजीवन मिशन योजनेचे साठवून ठेवलेले पाइप रविवारी भरदिवसा चारचाकी वाहनातून पळविण्याचा प्रयत्न सतर्क तरुणांनी हाणून पाडला. या प्रकारामुळे १३ कोटींची योजना रखडल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता संबंधित ठेकेदार आणि तत्कालीन पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात रविवारी काही व्यक्ती हे पाइप वाहनात भरत असताना तरुणांनी त्यांना जाब विचारला. मात्र त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्याने तरुणांनी विरोध केला. ज्यामुळे संबंधितांना पाइप न घेताच पळ काढावा लागला. दरम्यान तरुणांनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आहे.
रखडलेल्या जलजीवन योजनेप्रकरणी संबंधित ठेकेदार तसेच तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मागील दोन वर्षांपासून ही योजना रखडलेली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करणार असल्याचे सांगितले.
दौंडज येथील रखडलेल्या जलजीवन मिशन योजनेबाबत तसेच पाइप चोरीचा प्रयत्न, विजेच्या तारा व खांब काढून नेणे या गंभीर प्रकारांविरोधात, मंगळवारी (दि. २६) मा. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. गावच्या पाण्याच्या हक्कासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र राहून आवाज उठवूया.
– ॲड. मयुर जाधव, सामाजिक कार्यकर्ते, दौंडज.





