राजगड किल्ल्यावर बेकायदेशीर पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पुरातत्व विभागाच्या सतर्कतेमुळे साहित्य जप्त

Rajgad Fort | हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरेच्या परिसरात बेकायदा मेघडांबरी उभारणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात रात्री उशिरा मेघडांबरी उभारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास गडावरील अत्यंत महत्त्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरेच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी मेघडांबारी उभारली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुरातत्व खात्याचे पाहरेकरी गडावर आले असता त्यांनी राजसदेच्या परिसरात मेघडांबरी उभारलेली पाहिले.
याप्रकरणी पाहरेकऱ्यांनी पुरातत्व खात्याचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉ. वाहणे यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिस आणि महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. अवघ्या दिड- दोन तासात रणरणत्या उन्हात पायपीट करत राजगड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.महेश हरिश्चंद्रे, राजगड तालुका नायब तहसीलदार अमर बनसोडे यांनी महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तसेच वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ यांनी पोलिस पथकासह राजगडावर धाव घेतली.
राजसदरेच्या परिसरात बेकायदा उभारलेली मेघडांबरी काढून तिचे साहित्य जप्त करण्यात आले. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ म्हणाले, पुरातत्व विभागाने या प्रकरणी तक्रार केल्याने आम्ही घटनास्थळी जाऊन सदर बेकायदा प्रकाराचा रितसर पंचनामा केला. या प्रकरणी संबंधितावर भारतीय पुरातत्व संहितेनुसार कारवाई करण्यात येत आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Rajgad Fort |
पुरातत्व खात्याचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, राजगड किल्ला हा राज्य संरक्षित स्मारक आहे. त्यामुळे गडावर कोणत्याही प्रकारची बेकायदा वास्तु तसेच इतर साहित्य उभारण्यास मनाई आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरेच्या परिसरात बेकायदा मेघडांबरी उभारलेली जप्त करण्यात आली असून या प्रकरणी वेल्हे पोलिसांकडे रितसर तक्रार करण्यात आली आहे. यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी गडावर २४ तास पाहरेकरी नियुक्त करण्यात येणार आहेत. Rajgad Fort |





