शिरूरच्या गंगा पेट्रोलपंप परिसरात व्यापाऱ्यावर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर : शिरूर तालुक्यातील गंगा पेट्रोलपंप परिसरात किरकोळ कारणावरून तीन अनोळखी व्यक्तींनी व्यापाऱ्यावर हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत व्यापाऱ्याला डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून शिरूर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्वनाथ सिताराम चिपाडे (वय ४०, व्यवसाय – व्यापारी, रा. बोराडेमळा, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता शिरूर गंगा पेट्रोल पंप परिसरात तीन अनोळखी इसमांनी “हॉर्न का वाजवतोस?” असा वाद घालत त्यांना खाली पाडून हाताने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी शिवीगाळ करत आरोपींपैकी एकाने जवळ पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारला. यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली. तसेच “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार आर. एस. साबळे हे करत आहे.
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
शिरूर शहर व परिसरात वारंवार होणाऱ्या हाणामाऱ्या, चोऱ्या, गुंडगिरी, अवैध्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून शिरूर शहरात कायदा सु व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





