शरद पवारांच्या घरावर हल्ला; ऍड. सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या तसेच घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी भडकवल्यामुळेच हा हल्ला झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. याला आता सदावर्ते यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एका केससंदर्भात न्यायालयात युक्तीवाद करत असताना माझ्या कानावर ही बातमी आली. मी त्यांना थांबायला सांगितलं. मी व्हिडिओ पाहिला असून काही कष्टकरी महिला व्यथित झालेल्या दिसतायत. काही महिलांना चक्कर आलेली दिसतेय. खासदार सुप्रिया सुळे तिथे चर्चा करायची आहे असं त्या म्हणतायत. याआधी सुप्रिया सुळे यांनी या कष्टकऱ्यांना चर्चेसाठी कधी बोलावलं होतं का, हे त्यांनी आधी स्पष्ट करावं, असं अॅड सदावर्ते यांनी म्हटलं.
न्यायालयात या प्रकरणाचा युक्तीवाद झाला होता. आज निकाल लागणार होता. न्यायालयाने जो निकाल दिला आहे, त्यात कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय दिले. पण महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खोटं सांगितलं की, न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की विलीनीकरणाचा रिपोर्ट ही चॅलेंज झाला पाहिजे, त्यानंतर पुढील आदेश होईल. न्यायालयाने एसटी कामगारांविरोधात निकाल दिला आहे असं गृहमंत्री बोलले, ते खोटं आहे.
दरम्यान 124 महिलांचं कुंकू पुसलं गेलं आहे. व्यथित झालेल्या त्या महिला आहेत. त्यांनी हल्ला केलाय असं म्हणू नका. जय श्री रामचा गजर कोण करत होतं माहित नाही, त्यांच्या अपरोक्ष कुणी काय केलं असेल तर मला माहित नाही. हल्लेखोर असते तर त्या व्यथित झाल्या नसत्या, असं अॅड सदावर्ते यांनी म्हटलंय.
नेमकं काय घडलं?
अनेक संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे आज चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही.
दरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्व्हर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत होत्या.





