इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ला अमान्य; अमेरिकेने स्पष्ट केली भूमिका

वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलही मोठा पलटवार करण्याचा विचार करत आहे. इस्रायल इराणच्या आण्विक स्थळांना तसेच तेल सुविधांना लक्ष्य करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अण्वस्त्र स्थळांवर इस्त्रायलने हल्ला केला तर त्या हल्ल्यांना अमेरिका पाठिंबा देणार नाही असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या आण्विक साइट्सवर कोणत्याही इस्रायली हल्ल्याचे समर्थन करणार नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीच बुधवारी सांगितले आणि इस्रायलला सबुरीने कारवाई करण्याचे आवाहन केले. इराणवर आणखी निर्बंध लादले जातील आणि लवकरच नेतान्याहू यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बायडेन यांनी सांगितले.
दरम्यान, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढणाऱ्या इस्रायलमध्ये यंदाचे ज्यू नववर्ष युद्धाच्या छायेत घालवले जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी लोकांना ज्यू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि हे संपूर्ण विजयाचे वर्ष असेल असे सांगितले. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये नेतान्याहू म्हणाले की हे संपूर्ण विजयाचे वर्ष असेल. इस्रायलच्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.





