सोलापूर : सोलापूरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे थरारक पद्धतीने अपहरण आणि हत्येचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. शरद पवार गटाचा समर्थक अमित सुरवसे याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचा आरोप आहे. 2021 मध्ये पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी शरणुने अमितला मारहाण केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद मिटल्याचे भासवत अमितने बदला घेण्यासाठी शरणुचे अपहरण केले. अमितने पुण्यातून भाड्याची कार घेऊन सोलापुरात येत शरणुला शस्त्राचा धाक दाखवून घराजवळून उचलले आणि हत्येच्या उद्देशाने कर्नाटकच्या दिशेने पळ काढला. सोलापूर पोलिसांनी तत्परता दाखवत 4 पथके रवाना केली आणि रात्री 10 वाजता अमितसह 6 जणांना ताब्यात घेतले. गंभीर जखमी अवस्थेतील शरणुला सोलापुरात उपचारासाठी आणण्यात आले. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अमित आणि त्याच्या साथीदारांवर हत्येच्या उद्देशाने अपहरणाचा गुन्हा नोंदवला गेला आहे. पडळकर सकाळी सोलापुरात येऊन जखमी कार्यकर्त्याची भेट घेणार आहेत.