मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयावर हल्ला; पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
Updated On:

मुंबई – मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करत तोडफोड केली आहे. यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज देखील केला आहे. दरम्यान, या कार्यालयासमोर झालेल्या या प्रकरणानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मात्र, तेथे देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संसदेच्या आवारात झालेल्या धक्काबुक्कीवरून काँग्रेस आणि भाजपाचे नेते आमने-सामने आले असतानाच त्याचे पडसाद मुंबईत देखील उमटताना दिसत आहेत. मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी जोरदार लाठीमार करत या आंदोलकांना घटनास्थळावरून पांगवले.





