शेतकरी आंदोलकांचा संयम सुटू लागला; भाजप नेत्यांवर चंदिगढमध्ये हल्ला

चंदीगढ – गेले आठ महिने सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलकांचा आता संयम सुटू लागला असून कथित आंदोलक शेतकऱ्यांनी सेक्टर 48 मध्ये पोलिसांच्या उपस्थितीतच भाजपा नेते संजय टंडन आणि चंदिगढचे महापौर रविकांत शर्मा यांच्या वाहनांवर हल्ला केला.
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलकांनी भाजपा नेत्यांवर हल्ला करण्याची ही हरियाणातील पहिलीच वेळ आहे. भाजपाचे चंदीगढचे माजी अध्यक्ष असणार टंडन हे सध्या भाजपाचे हिमाचलचे सह प्रमुख आहेत.
मार्केट असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजपाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांसह गेले होते. त्यावेळी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निदर्शनांना सुरवात झाली. त्यानंतर या निदर्शनांना हिंसक वळण लागले.
मी माझ्या रेंज रोव्हर गाडीतून जात होतो. त्यावेळी अचानक निदर्शक माझ्या मोटारीसमोर आले. त्यापैकी काहींनी लोखंडी रॉडसारख्या कठीण वस्तूंनी माझ्या मोटारीच्या काचेवर प्रहार केले. गाडीची मागील खिडकी फुटली. गाडीच्या पुढील काचेचे नुकसान झाले.
हल्ला करणारे सर्व जण बाहेरून आलेले होते. तो पूर्वनियोजित कट होता. शर्मा यांच्या शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे. त्यांच्या चालकाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. चंदिगढ पोलिसांना आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे, असे टंडन यांनी या घटनेनंतर सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, निदर्शक हिंसक झाल्याने पोलिसांनी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना घटनास्थळावरून जाण्यास सुचवले. त्यानंतर टंडन यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी सेक्टर 34 मधील पोलीस ठाण्यात गर्दी केली तेथे पोलिस अधिक्षक कुलदीप चहल यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान पोलिसांनी स्थानिक गायक सर्बन प्रतिक याच्यासह सहा शेतकऱ्यांना भाजपा नेत्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले.





