अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजप उमेदवाराच्या बहिणीवर हल्ला; नेमकं काय घडलं?

Pratap Adsad Sister Attack | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर सोमवारी प्रचारसभेची सांगता झाल्यानंतर हल्ला करण्यात आला. यात त्यांच्या डोक्याला मार लागला. सध्या त्यांचा जखमी झाल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे या घटनेला 24 तास पूर्ण होत नाही. तोपर्यंत महायुती उमेदवाराच्या बहिणीवर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
धामणगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे (अडसड) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सोमवारी रात्री हल्ला केला. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील सातेफळ फाट्यावर ही घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाली आहे. Pratap Adsad Sister Attack |
नेमकं काय घडलं?
१८ नोव्हेंबर रोजी भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे या मतदार संघात प्रचार करून परतत असतांना मतदार संघातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अर्चना रोठे यांच्या हाताला गंभीर घाव झाल्याचे समजते. त्यांची गाडी क्रमांक एम.एच. २७ डी.बी. ५००१ या गाडीचे समोरील काच फोडण्याचा प्रयत्नही हल्लेखोरांकडून करण्यात आला आहे. Pratap Adsad Sister Attack |
घटनेनंतर अर्चना रोठे यांना चांदूर रेल्वे शहरातील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावतीत पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करण्याकरता चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन एकच गर्दी केली होती. सदर घटनेचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे. दरम्यान, अर्चना रोठे या ज्येष्ठ भाजप नेते अरूण अडसड यांच्या कन्या आहेत. त्यांनी प्रताप अडसड यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात उमेदवारांवरच अशा प्रकारचे हल्ले होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यांवरून राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.
हेही वाचा :
अनिल देशमुखांवरील हल्ल्याबाबत संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप ; म्हणाले,”हा हल्ला…”





