Anil Pawar Attack: इंदापूर कडकडीत बंद! अनिल पवारांवरील जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ जनआक्रोश
Anil Pawar Attack: इंदापुरात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी.

Anil Pawar Attack – इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल (अण्णा) पवार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पुकारण्यात आलेल्या इंदापूर बंदला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यापारी, व्यावसायिक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व आस्थापने बंद ठेवत आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे शहरात शंभर टक्के कडकडीत बंद पाळला गेला.
दुपारी बाबा चौक ते नगरपरिषद मैदान या मार्गावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये दयानंद इरकल, प्रदीपदादा गारटकर, तानाजी धोत्रे, संजय शिंदे, विठ्ठल ननवरे, दत्ता पवार, बाबा वजाले, किरण गाणबोटे, माऊली नाचण, राजकुमार धोत्रे, ड. आत्माराम चौगुले, विशाल पवार, दत्तात्रय (भाऊ) जगताप, कोंडीबा (पिंटू) घोडके, स्वप्निल बाळू गुंजाळ, ज्ञानदेव चौगुले, रोहिदास पवार, ड. विजय पवार, अनिल दत्तात्रय चौगुले, अक्षय शिंदे, दुर्गा शिंदे,
लेखन चौगुले यांच्यासह विविध सामाजिक संघटना, व्यापारी, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चानंतर नगरपरिषद मैदानात झालेल्या निषेध सभेत वक्त्यांनी भरदिवसा लोकप्रतिनिधीवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविला. आरोपींसह कटामागील सूत्रधारांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर म्हणाले, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणार्या लोकप्रतिनिधीवर झालेला हा हल्ला लोकशाहीवरील प्रहार आहे.

इंदापूर : अनिल (अण्णा) पवार यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या भव्य निषेध मोर्चात सहभागी नागरिक व पदाधिकारी.
अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी. यानंतर तहसीलदार आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात हल्लेखोरांसह कटामागील मुख्य सूत्रधारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करावी, अनिल (अण्णा) पवार यांना शासकीय सशस्त्र पोलीस संरक्षण द्यावे,
तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुग्णालयात जाऊन अनिल (अण्णा) पवार यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी पोलीस प्रशासनाला हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
निवेदनातील प्रमुख मागण्या
हल्लेखोर व कटामागील सूत्रधारांना तातडीने अटक करावी. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी. अनिल (अण्णा) पवार यांना शासकीय सशस्त्र पोलीस संरक्षण द्यावे. इंदापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात. गंभीर गुन्हेगारांवर हद्दपारीसह कठोर कारवाई करून गुन्हेगारीवर कायमस्वरूपी वचक निर्माण करावा.





