Anil Deshmukh : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुखांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नागपूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर सोमवारी रात्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनिल देशमुख मोठ्या प्रमाणात जखमी झाले. त्यांना तातडीने काटोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना आता डिस्चचार्ज देण्यात आला आहे. यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख?
‘मी मरणार नाही, आणि तुम्हालाही सोडणार नाही, आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला त्याला सोडणार नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वाहनावर झालेल्या हल्लानंतर राजकीय वातावरण तापलं असून, विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.
काय घडले होते नेमके?
सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. अनिल देशमुख हे नरखेड येथील आपली शेवटची प्रचार सभा आटोपून काटोलच्या दिशेनं निघाले होते, यादरम्यान काटोल जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या गाडीची समोरची काच फुटली आणि ते जखमी झाले.या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.





