Mamata Banerjee : “अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित”; ममता बॅनर्जींचा आरोप
रात्री २ ते ३ च्या सुमारास भाजपच्या गुंडांनी पोलिसांना सोबत घेऊन लोकांच्या घरावर हल्ले केले. मध्यरात्री लोकांच्या घरात घुसून अशी गुंडगिरी का केली जात आहे? असा सवाल ममता यांनी उपस्थित केला.

Mamata Banerjee – तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानावर मध्यरात्री झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केला आहे. या गुंडगिरीविरोधात आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रात्री २ ते ३ च्या सुमारास भाजपच्या गुंडांनी पोलिसांना सोबत घेऊन लोकांच्या घरावर हल्ले केले. मध्यरात्री लोकांच्या घरात घुसून अशी गुंडगिरी का केली जात आहे? असा सवाल ममता यांनी उपस्थित केला.
कालीघाट आणि पटुआपाडा परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत जमावबंदी लागू करून पोलीस कालीपूजेच्या तयारीमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलीस प्रशासनाने निष्पक्ष राहावे असा सल्ला देताना ममता म्हणाल्या, पोलीस अधिकारी आपल्या मर्यादेबाहेर काम करत आहेत. जर तुम्ही सीमा ओलांडली तर मी तुमच्याविरोधात लढा देईन.
यापूर्वी अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज शेअर करत भाजप कार्यकर्त्यांनी दोन दिवस पाळत ठेवून (रेकी) त्यांच्या घरावर हल्ला केल्याचा दावा केला. गेल्या ६ महिन्यांत आपल्या जीवावर बेतलेला हा ७ वा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.





