Attack in Saudi Arabia : सौदी अरेबियामध्ये (Attack in Saudi Arabia) काल इराणकडून झालेल्या माऱ्यामध्ये कोणीही भारतीयाची जीवितहानी झालेली नाही, असे रियाधमधील भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे. सौदी अरेबियातल्या अल खार्ज या रहिवासी भागामध्ये काल झालेल्या हल्ल्यात भारतीय व्यक्ती ठार झाल्याचे म्हटले गेले होते. मात्र सुदैवाने या हल्ल्यात कोणीही भारतीय नागरिक ठार झालेला नाही. या घटनेमध्ये एक भारतीय व्यक्ती जखमी झाला असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. या घटनेनंतर भारतीय दूतावासाच्यावतीने सौदीतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला गेला आहे. कौन्सिलर वाय साबीर यांनी रविवारी रात्री अल-खार्जला भेट दिली आणि घटनेत जखमी झालेल्या जखमी भारतीय नागरिकाची भेट घेतली. सध्या तो अल खार्ज येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. असे निवेदनात म्हटले आहे. अल-खार्जमधील एका देखभाल आणि स्वच्छता कंपनीच्या निवासी संकुलावर लष्करी प्रक्षेपक आदळल्याने दोघांचा मृत्यू झाला, त्यात एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. या घटनेत एका बांगलादेशी नागरिकाचाही मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले, असे रविवारी, सौदी नागरी संरक्षण विभागाने म्हटले होते. त्यानंतर आज हे स्पष्टिकरण देण्यात आले. मात्र मरण पावलेल्या व्यक्ती कोणत्या देशाच्या आहेत, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.