शिरूर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवार दिनांक ७ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात छापा टाकून मॅफेड्रॉन (एमडी ड्रग्ज) या अमली पदार्थ विक्री करणारे २ तरुणांना ताब्यात ताब्यात घेऊन सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. रांजणगाव एमआयडीसी व शिरूर परिसरात सध्या एमडी सारख्या अत्यंत घातक अमली पदार्थाच्या विळख्यात अनेक तरुण व्यसनाधीन झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आल्याचे वृत्त एका प्रसिद्धी माध्यमावर प्रसारित झालेले होते. त्याची तात्काळ दखल घेऊन पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दहशतवादी विरोधी पथकास कारवाई करणे बाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक हे रांजणगाव व शिरूर परिसरांमध्ये वेशांतर करून अमली पदार्थाची अवैध विक्री साठा याबाबत माहिती काढत असताना सदर पथकास एका खबऱ्यामार्फत शिरूर हद्दीत पुणे-अहिल्यानगर हायवे लगत एका एम्पायर नावाचे पान टपरीवर एक तरुण एमडी ड्रग्ज हा अंमली पदार्थ साठा करून त्याची ओळखीचे लोकांना विक्री करत आहे, अशी खात्रीदायक माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे दहशतवादी विरोधी पथकाने शिरूर पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांचेसह साध्या वेशात सदर ठिकाणी छापा टाकून एमडी नावाचे अमली पदार्थ विकणारे १) साहील संदीप करंजुले वय २० रा.पाडळी रांजणगाव ता. पारनेर जि.अहिल्यानगर २) ओंकार संजय धावडे वय २३ रा.रामलिंग रोड, शिरूर ता.शिरूर जि. पुणे असे २ तरुणांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडून सुमारे एक लाख चार हजार रुपये किंमतीचा विक्रीसाठी बाळगण्यात आलेला एमडी ड्रग्ज नावाचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला. सदर दोघे आरोपी यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे अमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर कामगिरी ही पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक, तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, राहुल भवर, पवन तायडे यांचे पथकाने केली आहे. सदर आरोपींना कोर्टासमोर हजर केले असता पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. आरोपींनी सदरचे अमली पदार्थ कोठून आणले? अमली पदार्थ रॅकेटचे सूत्रधार कोण आहेत? याबाबत पुढील अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते हे करीत आहेत. पोलिसांसमोर मोठे आव्हान एमडीसारख्या घातक ड्रग्समुळे अनेक तरुणांचे आरोग्य आणि करिअर उध्वस्त होत आहे. कुटुंबाची शांतता हरवत चालली असून अनेक घरे देशोधडीला लागलेली आहेत. ग्रामीण भागातही याची कीड लागल्यामुळे या रॅकेटची पाळेमुळे उध्वस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. हेही वाचा : Sanya Malhotra : ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राच्या लव्ह लाईफला ब्रेक? ऋषभसोबत ब्रेकअपच्या चर्चांना उधाण