Delhi CM Atishi Oath Ceremony : आतिशी यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; बनल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री

Delhi CM Atishi Oath Ceremony : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीला आज नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. लेफ्टनंट गव्हर्नर सचिवालयात आयोजित कार्यक्रमात आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, गोपाल राय, इमरान हुसैन, मुकेश अहलावत या 5 मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
#WATCH | AAP leader Atishi takes oath as Chief Minister of Delhi pic.twitter.com/R1iomGAaS9
— ANI (@ANI) September 21, 2024
दरम्यान, केजरीवाल यांच्या राजीनाम्यापूर्वी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची नवीन नेता म्हणून निवड करण्यात आली होती. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दीक्षित यांच्यानंतर आम आदमी पार्टीच्या आतिशी या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री तर देशाच्या 17व्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
आतिशी यांनी आम आदमी पार्टीमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. 2013 मध्ये निवडणूकीत पदार्पण करणाऱ्या आम आदमी पक्षाचा पहिला जाहीरनामा तयार करणाऱ्या जाहीरनामा मसुदा समितीच्याही त्या सदस्य होत्या आणि सुरुवातीच्या काळात पक्षाची धोरणे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आम आदमी पार्टीचे प्रवक्ते असतानाही आतिशी यांनी प्रमुख व्यासपीठांवर पक्षाचा जोरदार बचाव केला आहे.




