आतिशी यांनी आपची प्रतिष्ठा राखली

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी येथून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी निवडणुकीत भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव केला आहे. राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा अलका लांबा यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम आतिशी यांनी ३५०० हून अधिक मतांनी निवडणूक जिंकली आहे.त्यांच्यात आणि भाजपच्या बिधुरी यांच्यात अखेरपर्यंत चुरस पाहायला मिळाली. अखेर आतिशी यांनी बिधुरींना मात देत पक्षाची प्रतिष्ठा राखली.
रमेश बिधुरी यांनी मुख्यमंत्री आतिशी यांना कडक टक्कर दिली. एकेकाळी असे वाटत होते की ते निवडणूक जिंकतील पण शेवटच्या तीन फेऱ्यांच्या मतमोजणीच्या वेळी, आतिशीने आघाडी मिळवण्यास सुरुवात केली आणि रोमांचक लढतीत निवडणूक जिंकून आम आदमी पक्षाचा सन्मान वाचवला.
खरं तर, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर आतिशींचा विजय आपला दिलासा देणारा ठरणार आहे.
२०२० च्या निवडणुकीतही आम आदमी पक्षाने कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपने रमेश बिधुरी आणि काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी देऊन स्पर्धा कठीण केली होती, परंतु काँग्रेसला येथे फारशी मते मिळाली नाहीत. काँग्रेसला येथे पाच हजार मतेही मिळू शकली नाहीत.





