अतिरुद्र महायागाला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात आरंभ

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -गणेशपूजन, महासंकल्प, महान्यास, तब्बल 11 प्रकारचे श्री गणेश, श्री महादेव अभिषक, गणेश लक्ष अर्चना यांसह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी आणि अकरा दिवसीय अतिरुद्र महायागाला दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ झाला. 125 ब्रह्मवृंद सहभागी होत, हा याग करत आहेत. मंगळवार, दिनांक 9 ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी धार्मिक विधी मंदिरात सुरू आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे अतिरुद्र याग मंदिरात करण्यात येत आहे. वेदमूर्ती नटराजशास्त्री आणि ब्रह्मवृंद होम, विधी करत आहेत. महान्यास, मंत्रघोष, रुद्र जप, रुद्र होम, गणेश याग, सूर्य याग, विविध अभिषेक असे धार्मिक विधी याअंतर्गत केले जात आहेत. मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारून हे अतिरुद्र होम करण्यात येत आहेत.
आरोग्यसंपन्न समाजासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. त्यातील अतिरुद्र होम हा या विधींतील सर्वोच्च बिंदू आहे. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम 21 कुंडांचे जल याकाळात वापरले जात आहे. तसेच 21 आयुर्वेदिक औषधी वापर करण्यात येत आहे.





