आता थांबायचं नाय…! स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास

Ata Thambaycha Naay – स्वप्नपूर्ती करणारे शहर आणि याच मुंबई शहराला स्वच्छ ठेवण्या साठी अहोरात्र झटणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या शिलेदारांच्या जिद्दीची आणि स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी गोष्ट म्हणजेच आता थांबायचं नाय…. सत्य घटनेपासून प्रेरित हा प्रवास आपल्याला अंतर्मुख तर करतोच सोबतच ठराविक वर्गातील लोकांच्या आयुष्यातील सुन्न करणारे जळजळीत वास्तव समोर आणतो…
महाकाय कचरा, त्याचे संकलन, नियोजन, तुंबलेली, श्वास कोंडणारी गटार, तरीही हसत खेळत त्यात उतरणारी माणसं, समाजाने डावललेली, सततची अवहेलना सहन करून सुद्धा इतरांच्या आयुष्यात मोकळा श्वास देणारी हि माणसं स्वप्न कधी बघणार आणि पुर्ण तरी कशी करणार ?उदय शिरवळकर पालिका आयुक्त या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात देवदूत बनून येतात आणि त्यांना स्वप्न पहायला लावतात.. बहुतेक सर्व कर्मचारी 10 वी नापास असतात पण शिक्षण तुमच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणू शकतं याचे महत्व पटवून देतात आणि सर्वांना रात्रकालीन शाळेत शिकायला पाठवतात..
शिक्षक म्हणून खऱ्या अर्थाने हाडाचा शिक्षक असणाऱ्या माळी सरांना शिकवायची जबाबदारी देतात आणि इथून सुरु होतो स्वप्नपूर्ती चा प्रेरणादायी प्रवास…वेगवेगळ्या विभागातील भिन्न मनोवृत्तीचे, स्वभावाचे कामगार एकत्र येतात.. शिकायची अजिबात मानसिकता नसणाऱ्या या लोकांना शिक्षणाप्रती आस्था निर्माण करण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे काम माळी सर हातात घेतात..
हतबल,उदासीन समाजातील लोकांना सक्षम करण्यासाठी झटणाऱ्यांना येणारे अनुभव माळी सरांना पण येतात. पण या लोकांच्या मनात आग लावण्यात माळी सरांना यश येते का, त्यांचे हे जगावेगळे विद्यार्थी दहावी पास होतात का ? हे पडद्यावर पाहणे उत्कंठा वर्धक आहे..
सशक्त कथानक आणि सफाईदार दिग्दर्शन आणि तेवढाच दर्जेदार उत्तुंग अभिनय यामुळे चित्रपट उचित परिणाम साधतो. सुरवातीपासून अगदी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिग्दर्शक शिवराज वायचळ यशस्वी ठरले आहेत..
कामगारांची वस्ती, त्यांचे राहणीमान, त्यांची विचारसरणी याचे अचूक वास्तव चित्रण दाखवले आहे त्यामुळे हे सगळे खरोखर कामगार वाटतात आणि हि त्यांचीच गोष्ट असल्याचे पदोपदी जाणवते हेच या चित्रपटाचे यश आहे. आशुतोष गोवारीकर यांचा पालिका आयुक्त म्हणून सहज सुंदर अभिनय मनाला भिडतो.त्यांचा वावर संपूर्ण चित्रपटात जाणवतो. ओम भूतकर चे माळी सर लक्षात राहतात. शिकवण्याची धडपड, जिद्द, तगमग, त्याने उत्तम साकारली आहे.
सखाराम मंचेकर हे 35 वर्षपासून गटार साफ करणारे, दुर्गंधी हटवणारे, चोक up काढणारे ज्येष्ठ कर्मचारी… भरत जाधव यांनी जीव ओतून काम केले आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या व्यथा, वेदना, शोषित आयुष्य, तरुण मुलाच्या मृत्यूचे दुःख हे सर्व आपल्या जबरदस्त अभिनया तुन भरत जाधव अत्यंत प्रभाविपणे दाखवतात.. इतका जिवंत अभिनय आणि त्यांची अचूक देहबोली त्यामुळे सखाराम च्या व्यक्तीरेखेत ते एकरूप होऊन जातात. भरत जाधव यांचा सखाराम म्हणजे अभिनयाची पर्वणी आहे.
मारुती कदम हि व्यक्तीरेखा सिद्धार्थ जाधव ने साकारली आहे… पाणी खात्यात काम करणारा,आपल्या हुशार मुलीला शिकवण्यासाठी चोरून रात्री टॅक्सी चालवणारा, सिद्धार्थ ने सुद्धा जीव ओतून काम केले आहे. वरकरणी आनंदी असणारा पण आतील वेदना लपवणारा संयत अभिनय सिद्धार्थ ने केला आहे. नेहमीच एनर्जेटिक असणारा सिद्धार्थ यावेळेस प्रगल्भ वाटतो.
कचरा उचलणाऱ्या जयश्री (प्राजक्ता हणमधर) आणि अप्सरा जाधव (किरण खोजे) यांनी उत्तम साथ दिली आहे..दिपक शिर्के यांचा हळवा बाप भावुक करतो. सांग सांग भोलानाथ हे अवधूत चे गाणे मस्त जमले आहे पण अतुल गोगावलेचे आता थांबायचं नाय हे मुख्य गाणं लक्षात राहतं त्याच्या शब्दामूळे… चित्रपटाच्या कथेला साजेशी काव्यरचना आणि अतुल चा दमदार आवाज.. खूप छान..
शिवराज वायचळ,ओंकार गोखले आणि अरविंद जगताप यांचे कथानक शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. तर आता थांबायचं नाय हा एक चित्रपट नसून तो एक अनुभव आहे. दुर्गंधी कडून सुगंधाकडे जाणारा रंजक प्रवास आहे. हा चित्रपट पाहण्यापासून आता थांबायचं नाय…….
– राहुल सराफ (नागपूर)





