74व्या वर्षी मातृसुखाचा ‘दुहेरी’ आनंद

हैदराबाद – मातृत्वसुख अनुभवणे हे महिलांसाठी आनंददायी असते, याचे वर्णन शब्दात करणे अवघडच नव्हे तर अशक्य आहे. स्वतःचं अपत्य असावे, यासाठी आस लावून बसलेल्या 74 वर्षांच्या माऊलीची हाक अखेर निसर्गाने ऐकली. आंध्र प्रदेशात राहणाऱ्या मंगयाम्मा यांना 54 वर्षांच्या संसारानंतर स्वतःचं लेकरु हातात खेळवण्याचे सुख लाभले.
“आंधळा मागतो एक, देव देतो दोन’ या उक्तीचा प्रत्यय शब्दशः कोणी घेतला असेल, तर त्या आहेत मंगयाम्मा. कारण एका तरी बाळाने आपल्या पोटी जन्म घ्यावा, अशी इच्छा असलेल्या मंगयाम्मा यांना जुळ्या मुली झाल्या. आई होण्याचा अनुभव घेतानाच नकळत मंगयाम्मा यांनी विश्वविक्रमही रचला आहे.
मंगयाम्मा आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात असलेल्या नेलापार्टीपाडू गावात राहत होत्या. 22 मार्च 1962 रोजी त्यांचे लग्न येरामत्ती सीताराम राजाराव यांच्याशी झाले. मात्र, कित्येक प्रयत्न करुनही अपत्यप्राप्ती होत नव्हती. लग्नाला जसजशी वर्षे उलटू लागली, तसतशी राव दाम्पत्याची चिंता वाढायला लागली. अखेर, आपणही स्वतःचं मूल खेळवू शकतो, ही आशा धूसर होत गेली. राव दाम्पत्याने आपलं मन इतर गोष्टींमध्ये रमवलं, मात्र मनात कुठेतरी ही खंत होतीच.
काहीच महिन्यांपूर्वी मंगयाम्मा यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण डोकावला. शेजारी राहणाऱ्या 55 वर्षांच्या महिलेने आयवीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भधारणा केली. वय उलटून गेलेल्या महिलेला अपत्यप्राप्ती होत असल्याचे पाहून मंगयाम्मा यांची इच्छा बळावली.
गुंटूर शहरात असलेल्या “अहल्या नर्सिंग होम’शी त्यांनी संपर्क साधला. आयवीएफ एक्स्पर्ट डॉ. सानक्कायला उमाशंकर यांच्याशी मंगयाम्मा यांची भेट घडली. डॉक्टरांच्या भेटीत त्यांच्या सर्व शंकाचे निरसन झाले. त्यानंतर येरावत्ती राव यांचे स्पर्म घेऊन डॉक्टरांनी आयवीएफ पद्धतीचा अवलंब केला. डॉक्टरांचे प्रयत्न आणि राव दाम्पत्याच्या प्रार्थनेला यश आले. मंगयाम्मा यांना दिवस गेले.
गर्भधारणा झाल्यापासून प्रसुती होईपर्यंत मंगयाम्मा डॉक्टरांच्या निगराणीखाली होत्या. दहा डॉक्टरांचे पथक नऊ महिने त्यांची देखरेख करत होते. गुरुवारी मंगयाम्मा यांचे सिझेरियन झाले. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहेत. बाळांचे वडील येरामत्ती राजारावही आता 80 वर्षांचे आहेत.
वयाच्या 74 व्या वर्षी पहिल्यांदाच जुळ्या मुलींना जन्म देणं, हा विश्वविक्रम असल्याची माहिती डॉ. सानक्कायला उमाशंकर यांनी दिली. हा वैद्यकीय चमत्कार असल्याचेही ते म्हणतात.
याआधी, 2016 मध्ये राजस्थानमध्ये राहणाऱ्या दलजिंदर कौर यांनी 72 व्या वर्षी मुलाला जन्म दिला होता. पहिल्यांदा आई होणाऱ्या सर्वात वृद्ध व्यक्ती ठरण्याचा विक्रम त्यांच्या नावे होता.


