nagar | संगमनेरात गावठी दारू हातभट्टीवर छापा

संगमनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील राजापूर येथील हनुमाननगर परिसरात असलेल्या गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकत ३८ हजाराच्या मुद्देमालासह दारू बनवणारे साहित्य आणि रसायन जप्त केले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अलका काशिनाथ जाधव या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
शनिवार दि. ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास संगमनेर शहर पोलिसांनी शहरानजीक असणाऱ्या राजापूर शिवारातील हनुमाननगर परिसरातील मोकळ्या मैदानात गावठी हातभट्टीची दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला.
३२ हजार ५०० रुपये किंमतीचे २० लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या ३० बाटल्या व २५ लिटर क्षमतेचे लोखंडी पात्राचे दोन ड्रम तसेच ५ हजार रुपये किंमतीचे २५ लिटरच्या प्लास्टिकच्या बाटल्य मध्ये ५० लिटर गावठी दारू आणि ५०० रुपये किंमतीचे रसायन तयार करण्यासाठी वापरले जाणारे दोन टिपाड असा ३८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत ही हातभट्टी उद्ध्वस्त केली.
पोलिसांच्या या कारवाई दरम्यान हातभट्टी चालवणारी महिला पळून गेली. याप्रकरणी पो.कॉ सोमेश्वरी सुनील शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलका काशिनाथ जाधव (रा.हनुमाननगर,राजापूर) या महिलेविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.




