जकार्ता – इंडोनेशियाच्या जावा बेटाला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. (At Least 46 Dead In Indonesia Earthquake, 700 Injured) या भूकंपामध्ये किमान 46 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.
सुरक्षिततेसाठी राजधानी जकार्तातील नागरिकांनी रस्त्यांवर आश्रय घेतला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर होती आणि भूकंपाचा केंद्रबिंदू वेस्ट जावा प्रांतातील सियांजूर भागामध्ये जमिनीखाली 10 किलोमीटर अंतरावर होता, असे यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे.
भूकंपाशी संबंधित विविध घटनांमध्ये 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 700 जण जखमी झाले आहेत. इमारती पडल्यामुळेच बहुतेकजण जखमी झाले आहेत, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे.
सियान्जूर भागाच्या आजूबाजूच्या प्रदेशात दरडी कोसळण्याच्या काही घटनादेखील घडल्या आहेत. तर इतर अनेक इमारतींचे नुकसानदेखील झाले आहे. यामध्ये इस्लामिक बोर्डिंग स्कूल, एक रुग्णालय अन्य सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे. जीवित आणि वित्तहानीचा आढावा घेतला जात आहे, असेही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे.
भूकंपाचा धक्का राजधानी जकार्ताच्या परिसरात देखील जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक इमारतींबाहेर धावले. तर काही इमारती रिकाम्या केल्या गेल्या. इंडोनेशियाच्या बेटांवर भूकंपाचे धक्के अधूनमधून जाणवत असतात. मात्र, राजधानी जकार्तामध्ये भूकंप फारसा जाणवत नाही.
सोशल मीडियावरील उपाय ठरू शकतात घातक; YouTube वरील Video पाहून प्राशन केलेल्या ज्युसने घेतला बळी
फेब्रुवारीमध्ये वेस्ट सुमात्रा बेटावर झालेल्या भूकंपामध्ये किमान 25 जण ठार झाले होते. तर 460 जण जखमी झाले होते. तर गेल्या वर्षी जानेवारीतील भूकंपात किमान 100 जण ठार झाले होते. 2004 मध्ये जवळपास डझनभर देशांमध्ये आलेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीच्या तडाख्यात 2 लाख 30 हजार जण मरण पावले होते. यातील बहुतेकजण इंडोनेशियातील होते.