Shirur : करडे येथे विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी; १.५६ लाखांचा ऐवज लंपास
Shirur : याच ट्रान्सफॉर्मरचे झाकण उघडून अज्ञात चोरट्यांनी आतील तांब्याच्या तारा चोरुन नेल्या. दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० ते २० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे.

शिरुर : शिरुर तालुक्यातील करडे येथे अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडुन त्यातील तब्बल ५२० किलो तांब्याच्या तारांवर डल्ला मारला. या चोरीत १ लाख ५६ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रांजणगाव औद्योगिक वसाहत टप्पा क्रं तीन करडे येथील स्टेरिऑन कंपनीच्या शेजारील शेड क्रमांक १३ च्या दक्षिणेकडील मोकळ्या जागेत ६३० केव्हीए क्षमतेचा विद्युत बसविण्यात आला आहे. याच ट्रान्सफॉर्मरचे झाकण उघडून अज्ञात चोरट्यांनी आतील तांब्याच्या तारा चोरुन नेल्या. दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० ते २० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे.
विद्युत रोहित्रा मधील तांब्याच्या ताराच लक्ष्य
विद्युत रोहित्रा मधून चोरीला गेलेल्या तांब्याच्या तारांचे वजन अंदाजे ५२० किलो असून, त्यांची किंमत १ लाख ५६ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नानासाहेब हरिभाऊ सोनवणे (वय ५०) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान
विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. या चोरीमागे कोण आहे, तसेच चोरीचा मुद्देमाल कुठे नेण्यात आला, याचा तपास सुरु आहे. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करत आहेत.





