Shirur : शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका
Shirur : याप्रकरणी विद्युत कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार टेंगले करीत आहेत.

न्हावरे : शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निर्वी आणि कवठे येमाई येथील दोन व्यक्तींविरुद्ध हि कारवाई करण्यात आली असून, एका प्रकरणात महावितरण कंपनीचे तब्बल १३ लाख ६७ हजार ९७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या प्रकरणात वैभव विजय सोनवणे (रा. गट नं. २३८, निर्वी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध वीजमीटरमध्ये अनधिकृतपणे छेडछाड करून मीटरचा डिस्प्ले व पल्स बंद केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विद्युत कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार टेंगले करीत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात अरुण रोहिदास वागदरे (रा. गट नं. ४७८, कवठे येमाई, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध ऑगस्ट २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन तब्बल ८१ हजार ९५२ युनिट वीजचोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महावितरण कंपनीचे १३ लाख ६७ हजार ९७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार वायाळ करीत आहेत. या दोन्ही प्रकरणांमुळे शिरुर तालुक्यात वीजचोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.





