16 वर्षीय जिया रायने पार केली इंग्लिश खाडी; ही कामगिरी करणारी जगातील सर्वात तरुण पॅरा-जलतरणपटू बनली

मुंबई – जिया राय या स्वमग्नता (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) असलेल्या १६ वर्षीय मुलीने इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पोहून पार केली आहे. ही कामगिरी करणारी जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा-जलतरणपटू बनली आहे. भारतीय नौदलातील एमसी-एट-आर्म्स II, मदन राय यांची मुलगी, जिया हिने १७ तास २५ मिनिटांत ३४ किलोमीटरचे अंतर कापून ही कामगिरी केली.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्यांमध्ये जिया ही ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेली पहिली मुलगी आहे.
जिया हिने २८ जुलै रोजी इंग्लंडमधील ऍबॉट्स क्लिफ येथून पोहण्यास सुरुवात केली आणि २९ जुलैच्या पहाटे ती फ्रान्समधील प्टे डे ला कोर्टे – डून येथे पोहचली. जियाने आपली ही मोहीम ऑटिझम जागरूकतेसाठी समर्पित केली आहे.
मार्च २०२२ मध्ये, तिने १३ तास आणि १० मिनिटांत २९ किमीचा पल्ला पार करून, पाल्क सामुद्रधुनी ओलांडून सर्वात जलद पोहण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला होता. जियाने आपल्या जलतरण कौशल्यासाठी प्रतिष्ठित प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवला आहे.
जियाचे वय दोन वर्षांचे असतानाच तिला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असल्याचे निदान झाले होते. जियाला दररोज होणाऱ्या पार्क भेटी दरम्यान आपल्याला पोहण्याची आवड असल्याचे कळले होते. जिया अबोल असली तरी, तिच्या पालकांनी तिला व्हिडिओंद्वारे केलेल्या मार्गदर्शनामुळे तिची पॅरा-जलतरणपटू म्हणूनची कारकीर्द अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आली.
अवघ्या १,७०० लोकांनी केली खाडी पार…
गेल्या १०० वर्षात केवळ १,७०० लोकांनी इंग्रजी खाडी पार केली आहे. ही खाडी तिच्यातील बेभरवशाच्या प्रवाहांसाठी ओळखले जाते. जुलैमध्ये खाडीतील पाण्याचे तापमान १८ अंश असते आणि त्यामुळे हायपोथर्मिया होऊ शकतो. जेली फिशच्या धोक्यांव्यतिरिक्त, या खाडीत जगातील सर्वात जास्त वर्दळ असते. हे धोके पार पाडून जियाने ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे.




