इंग्लिश खाडी ओलांडण्याच्या प्रयत्नात ८ मृत्यूमुखी

नाईस (फ्रान्स) – फ्रान्सच्या उत्तरेकडील किनारपट्टीपासून इंग्लिश खाडी ओलांडण्याच्या प्रयत्नात किमान ८ जणांना जीव गमवावा लागला असल्याचे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
डझनभर प्रवाशांना घेऊन जाणारी बोट रात्रीच्या अंधारास उत्तरेकडील आंब्लेतेयूस या गावाजवच्या किनाऱ्याजवऱळ फ्रान्सच्या सागरी व्यवस्थापन अधिकाऱ्यांना आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मदतीसाठी बचाव जहाज रवाना करण्यात आले आणि बोटीवरील ५३ जणांची सुटका करण्यात आली, असे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आपत्कालिन उपचार करून देखील ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या ठिकाणी घेतलेल्या शोधादरम्यान अन्य कोणीही सापडले नाही. उपचारांसाठी ६ जणांना रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये १० महिन्यांच्या एका बाळाचाही समावेश आहे.
प्रचंड थंडीमुळे या सर्वांच्या शरीराचे तापमान प्रमाणापेक्षा कमी झाले होते. हे सर्व प्रवासी एन्ट्रीया, सुदान, सीरिया, अफगाणिस्तान, इजिप्त आणि इराण या देशांमधील होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोनच आठवड्यांपूर्वी शरणार्थ्यांना घेऊन जाणारी एक बोट इंग्लिश खाडीमध्ये बुडाल्याने १३ जणांचा मृत्यू झाला होता.





