पंधरा हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

पुणे : कोरोना मुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये चेन्नईहून राजकोटला जाणार्या कंटेनरला सोडण्यासाठी आडकाठी करून 20 हजार रुपयांची लाच मागून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महामार्गच्या सहायक पोलिस निरीक्षकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. परंतु, पैसे स्वीकारल्यानंतर आपल्यावर सापळा लावला असल्याची चाहूल लागताच तो आपल्या गाडीतून पळून गेला.
सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित रामचंद्र अधटराव (महामार्ग सुरक्षा पथक, वडगाव) याच्यावर या प्रकरणी वडगाव पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे बालरोड लाइन्स यांचे हायड्रोलिक/ एक्सएल गाडीवर चालक असून ते गाडीतून पवनचक्कीचे नेसल घेऊन चेन्नईवरुन निघून राजकोटला जात होते.
तक्रारदार व त्यांचे सहकारी अशा २ गाड्या सत्यजित अधटराव याने पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्यावर अडविल्या. ती दोन्ही वाहने 3 मे रोजी लॉकडाऊन उठल्यानंतर नंतर सोडली जाईल, असे कंटेनरचालकाला त्याने सांगितले. गाड्या सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार रुपये असे २० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. चालकांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली.




