म्युच्युअल फंडांच्या नियंत्रणाखालील मालमत्ता 70 लाख कोटी रुपयावर

कोलकत्ता – सरलेल्या वर्षात देशातील आणि परदेशातील आर्थिक परिस्थिती बरीच अनिश्चित होती. मात्र या कालावधीत भारतातील गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास वाढला असल्याचे दिसून येते. मार्च 2025 अखेर संपलेल्या वर्षात म्युच्युअल फंडांच्या नियंत्रणाखालील असलेली मालमत्ता वार्षिक पातळीवर 22.5 टक्क्यांनी वाढवून 70 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.
ही आकडेवारी ईक्रा या संस्थेने संकलित केली आहे. या संस्थेने म्हटले आहे की, एप्रिल 2025 मधील आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडांच्या ओपन इंडेड योजना मधील गुंतवणूक 23.80 टक्क्यांनी वाढली आहे. इक्विटी संदर्भातील ओपन इंडेड स्कीम मध्येही गुंतवणूक वाढत असल्याचे सांगण्यात आले.
एप्रिल 2025 च्या माहितीनुसार म्युच्युअल फंडांच्या खात्यामध्ये 30.21% वाढ झाली आहे. कर्ज रोख्यासंदर्भातील खात्यापेक्षा इक्विटी संदर्भातील खात्यांची संख्या जास्त असल्याचे नमूद करण्यात आले. सध्याच्या अस्थिर परिस्थितीच्या काळातही एप्रिल महिन्यामध्ये इक्विटी संदर्भातील म्युच्युअल फंडात 24,269 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली. यावरून गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावर विश्वास कायम असल्याचे दिसून येते असे या संस्थेने म्हटले आहे.
सरलेल्या वर्षांमध्ये एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूक करणार्या खात्यांची संख्या पाच टक्क्यांनी वाढून 914 लाख इतकी झाली आहे. आर्थिक परिस्थिती अस्थिर असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक अस्थिर राहिले. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी स्वतः गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येते.





