छोट्या कंपन्यांसंदर्भातील म्युच्युअल फंडांचे गुंतवणूकदारांना आकर्षण

मुंबई – देशातील आणि जागतिक शेअर बाजारातील परिस्थिती कमालीची अस्थिर आहे. ऑक्टोबर महिन्यापासून निर्देशांक बरेच कमी झाले आहेत. मात्र अशा परिस्थितीतही देशातील गुंतवणूकदारांनी शेअर संदर्भातील म्युच्युअल फंडात डिसेंबर महिन्यात केलेली गुंतवणूक 14 टक्क्यांनी वाढली. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅप संदर्भातील म्युच्युअल फंडाकडे गुंतवणूकदारांचा ओढा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
डिसेंबर महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक 14 टक्क्यांनी वाढून 41,156 कोटी झाली. ही एखाद्या महिन्यात झालेली विक्रमी गुंतवणूक आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेचा जास्त परिणाम होणार नाही असे या गुंतवणूकदारांना वाटत आहे.
डिसेंबर महिन्यात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून म्हणजे एसआयपीतून झालेली गुंतवणूक 26,459 कोटी रुपये आहे. जी की नोव्हेंबर महिन्यामध्ये 25,320 कोटी रुपये होती. एसआयपीच्या व्यवस्थापनखाली असलेली एकूण मालमत्ता सध्या 13.63 लाख कोटी रुपये असून म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या एकूण मालमत्तेच्या ती 20% आहे.
शेअर बाजारातील अस्थिर परिस्थितीतही इक्विटी म्युच्युअल फंडात होत असलेल्या गुंतवणुकीकडे लक्ष वेधले असता असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट छलसानी यांनी सांगितले की, ज्या कारणामुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये शेअर बाजारात अस्थिरता होती त्याच कारणांमध्ये आगामी काळामध्ये शेअर बाजारात अस्थिरता रेंगाळण्याची शक्यता आहे. मात्र तरीही किरकोळ गुंतवणूकदारांचा शेअर बाजारावर विश्वास असल्याचे यातून स्पष्ट होते. एसआयपीमधील वाढलेली गुंतवणूक त्याचे द्योतक आहे असे ते म्हणाले.
एकूण वातावरण मंद
इक्विटी म्युच्युअल फंडात आणि एसआयपीच्या माध्यमातून झालेली गुंतवणूक वाढली असली तरी एकूण म्युच्युअल फंड उद्योगातील वातावरण मात्र मंद होऊ लागले आहे. म्युच्युअल फंडाच्या नियंत्रणाखालील एकूण मालमत्ता डिसेंबरमध्ये कमी होऊन 66.93 लाख कोटी रुपये झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात ही मालमत्ता 68.08 लाख कोटी रुपये होती. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी काही रक्कम बाहेर जाते. या तिमाहीत कर्जरोख्यासंदर्भातील म्युच्युअल फंडातून 1.27 लाख कोटी रुपये काढून घेण्यात आले.





