विधानसभा निवडणूक: राज्य उत्पादन शुल्क विभागही सक्रीय; महिनाभरात ९२३ गुन्ह्यांची नोंद, ८४३ जणांना अटक

पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय झाला आहे. प्रशासनाने गेल्या महिनाभरात ९२३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ८४३ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ९६ वाहनासह ३ कोटी ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी.बी. राजपूत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये ५० प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. या व्यक्तींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येत असून आतापर्यंत १२ प्रकरणात रक्कम ९ कोटी ८० हजार रुपये इतक्या रक्कमेचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. या काळात गोवा राज्य निर्मित मद्याचे दोन गुन्हे उघडकीस आले असून या गुन्ह्यांमध्ये ३ लाख ६४ हजार १७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, तसेच धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीस आळा घालण्याच्या दृष्टीने एकूण १८ तात्पुरते चेकनाके उभारुन संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.





