विधानसभा निवडणूक: बंडखोरी मागे घ्या अन्यथा कारवाई; महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा इशारा

पुणे – “येत्या २४ तासात बंडखोरी मागे घ्या आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा. अन्यथा कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा महाविकास आघाडीने पुणे शहराच्या मतदार संघातील बंडखोर उमेदवारांना दिला आहे. बंडखोरांबरोबर फिरणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी मंगळवारी कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली.
कसबा मतदारसंघात काॅंग्रेसच्या कमल व्यवहारे, पर्वतीमध्ये आबा बागूल, तर शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे.
हडपसरमध्ये शिवसेनेचे गंगाधर बधे यांनी बंडाचे निशाण उभारले आहे. प्रदेश पातळीवरील नेत्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे, असे अरविंद शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. कोणी पक्षाला आव्हान देत असेल तर पक्षही त्याला तेवढ्यात ताकदीने उत्तर देईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. गंगाधर बधे यांची पक्षातून हकलपट्टी करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच त्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मोरे यांनी सांगितले.
मनीष आनंद यांच्या पत्नी पूजा आनंद या महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा आहेत. त्यांनाही नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्या पक्षाबरोबर राहणार असतील, तर कारवाई होणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.




