पिंपरी | केळवली गावात दोघांवर प्राणघातक हल्ला

खालापूर (वार्ताहर) – खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील केळवली गावात शनिवारी (दि. २४ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास दोन युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये कल्पेश दिसले याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा सहकारी प्रशांत दिसले यालाही मारहाण करण्यात आली.
खालापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी फिर्यादीने केली आहे. दोन्ही युवकांवर खोपोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत कल्पेश दिसले यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, केळवली वणी याठिकाणी एका खासगी कंपनीच्या जागेत कुमार दिसले, कैलास दिसले आणि इतर लोकांनी काम चालू केले असता मी आणि माझा भाऊ प्रशांत दिसले असे वर्क आर्डरशिवाय काम का चालू केले, अशी विचारणा करण्यासाठी गेलो.
तेव्हा सर्वांनी मिळून आम्हाला जीवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण केली. माझ्या छातीवर, मांडीवर, हातावर आणि भावाच्या डोक्यावर दुखापत केली असून कुमार दिसले नामक व्यक्तीने आपल्यावर चाकूने वार केल्याची तक्रार कल्पेश दिसले यांनी खालापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





