Assam Accident : आसाममध्ये भीषण अपघात; मिनी बस-कंटेनरची समोरासमोर धडक, 23 जणांचा मृत्यू
Assam Accident : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ मिनी बस आणि कंटेनर ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.

Assam Accident : आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी (दि. १३) भीषण रस्ते अपघात झाला. मिनी बस आणि कंटेनर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन २३ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले.
गोलाघाट जिल्ह्यातील कोहोरा रेंजमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७१५ वर हातिकुली टी इस्टेटजवळ रंगाजन परिसरात ही दुर्घटना घडली. धडक इतकी जोरदार होती की मिनी बसचा मोठा चुराडा झाला. अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले.
गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगामुळे मिनी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे. त्यामुळे बस समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकला धडकली असण्याची शक्यता आहे.
मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल. सुरुवातीला या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, उपचारादरम्यान आणखी काही जखमींचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २३ वर पोहोचला. अपघाताच्या वेळी बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, याची माहिती तातडीने मिळू शकली नाही.
बसचा चुराडा; प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाची धडपड
अपघातातील जखमींना सुरुवातीला कोहोरा मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जोरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढताना बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागला. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे मदतकार्य केले. आसामचे पंचायत व ग्रामीण विकास मंत्री अतुल बोरा यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. ते या भागाचे स्थानिक आमदारही आहेत.
I am deeply distressed by the tragic accident in Kaziranga earlier today. The scale of this loss has shaken all of us, and my heart goes out to every family that has lost a loved one. No words can ease their pain, but I want them to know that they are not alone. All of Assam stands with them in this hour of grief.
Our foremost priority now is to make sure the injured receive the best possible medical care without delay. Hon’ble Minister Shri @ATULBORA2 is at the site and personally overseeing the relief arrangements. I pray for the swift recovery of the injured and for strength for the bereaved families.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) November 13, 2026
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडून दुःख व्यक्त
या भीषण अपघाताबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दुःख व्यक्त केले. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. तसेच, या कठीण प्रसंगी संपूर्ण आसाम राज्य पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले.
जखमींना तातडीने आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री अतुल बोरा घटनास्थळी उपस्थित असून मदत व बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत आणि मृतांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली.





