Assam Flood Updates: आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 24 लोकांचा मृत्यू, 7 लाखांहून अधिक प्रभावित

नवी दिल्ली – आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. 22 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे दोन मुलांसह आणखी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 7 लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. आसाममध्ये यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांची संख्या आता 24 वर पोहोचली आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) दैनिक पूर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कांपूर महसूल विभागात चार लोक बुडाले. होजई जिल्ह्यातील डोबोका येथे एका व्यक्तीचा आणि कचारमधील सिलचरमध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बारपेटा, विश्वनाथ, कचार, दरंग, गोलपारा, गोलाघाट, हैलाकांडी, जोरहाट, कामरूप, कार्बी आंगलाँग पश्चिम, करीमगंज, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, सोनितपूर आणि उदलगुरी येथे लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे.
लष्कर, निमलष्करी दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, SDRF, नागरी प्रशासन आणि प्रशिक्षित स्वयंसेवक मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. आसाममधील पुराचा सततचा कहर पाहता हवाई दलाने मोर्चेबांधणी केली आहे. हवाई दलाचे जवान मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. ते पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहे.
ब्रह्मपुत्राने धोक्याचा टप्पा ओलांडला –
ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. जोरहाट जिल्ह्यातील निमतीघाट आणि नागाव जिल्ह्यातील कामपूर भागातील कोपिली नदीही धोक्याच्या चिन्हावर आहे. आसाममधील पुरामुळे वाहतूक संपर्क विस्कळीत झाला आहे, त्यामुळे उडान योजनेअंतर्गत गुवाहाटी आणि सिलचर दरम्यान आपत्कालीन विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, या विमान सेवेतील तिकिटाची किंमत प्रति सीट 3,000 रुपये असेल.





