निवडणूक लांबणीवर गेल्याने इच्छुकांचा हिरमोड

राहाता – नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर नेऊन नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याची भूमिका घेतल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांची हिरमोड झाला. निवडणूक कार्यक्रम पुढे गेल्याने इच्छुक उमेदवारांना मतदारांना खुश ठेवण्यासाठी खिसा खाली होण्याची भीती वाटू लागल्याने निवडणुकीत जे होईल ते होऊ दे, परंतु निवडणूक लवकर घ्या, अशा राजकीय चर्चा सध्या शहरात रंगू लागल्या आहेत.
मागील महिन्यात राज्यात अनेक राजकीय घडामोडी नंतर शिंदे गट व भाजप यांच्यात हातमिळवणी झाल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावा लागला. राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार नगरपरिषद निवडणुकीबाबत काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. महाविकास आघाडी सरकारने आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकामध्ये बदल करत नगराध्यक्ष निवड ही नगरसेवकातून करण्याचे घोषित करण्याचा निर्णय घेत मोठे प्रभाग असलेले प्रभाग छोटे करून प्रत्येक प्रभागात दोन सदस्य पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे इच्छुकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
ओबीसी राजकीय आरक्षण मुद्द्यावरून निवडणुका पुढे गेल्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये मरगळ पसरली दिसली. अनेक इच्छुक उमेदवारांना मतदारांना खुश ठेवण्याकरिता आपला खिसा रिकामा करण्याची वेळ आली. परंतु जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिंदे गटाने आपला वेगळा गट स्थापन करून भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी, आघाडी सरकारला खुर्चीतून खाली उतरावे लागले. 8 जुलैला राज्य निवडणूक आयोगाने 18 ऑगस्ट रोजी नगरपरिषद निवडणुका घेण्याचे निर्णय अचानक घेतल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु नव्याने स्थापन झालेल्या सरकारला नगराध्यक्ष निवड हे थेट जनतेतून करण्याच्या भूमिकेत असल्यामुळे व ओबीसी राजकीय आरक्षण तसेच सध्या राज्यात विविध भागात सुरू असलेली अतिवृष्टी यामुळे सरकारने निवडणूक आयोगाला नगरपरिषद निवडणुका घेण्यासाठी काही महिने मुदत द्यावी, अशी विनंती केली होती.
त्या अनुषंगाने 15 जुलै रोजी निवडणूक आयोगाने आगामी होणाऱ्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलायचा निर्णय जाहीर केला. आगामी घेण्यात येणारी नगराध्यक्ष व सरपंच निवडणूक ही थेट जनतेतून होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे सूर दिसू लागले. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून दिल्यामुळे नगराध्यक्ष यांच्या मर्जीने कारभार करतात. नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे होण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे नगरसेवक पदाला फारसे महत्त्व राहत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. नव्याने स्थापन झालेले सरकार प्रभागरचनेबाबत काय भूमिका घेईल, प्रभागरचना दोन सदस्य पद्धतीची राहील की पुन्हा एका प्रभागात चार किंवा पाच नगरसेवक निवडून द्यावे लागतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





