तुझ्यावर आयकर विभागाची धाड टाकायला सांगतो; लोणीकरांची वीज कर्मचाऱ्याला धमकी

औरंगाबाद – सातारा परिसरातील बंगल्यातील वीजबील थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडल्यामुळे संतापलेले भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी आज वीज कर्मचाऱ्यांवर आरेरावी केली. तसेच कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मी ३० वर्षांपासून आमदार आहे. माझी वीज तोडण्याऐवजी झोपडपट्टी, दलित वस्त्यातील तोडा असं सांगत लोणीकरांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे. लोणीकरांनी त्या कर्मचाऱ्याला निंलबित करण्याची धमकी तर दिलीच, पण त्याचसोबत आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकीही दिली. या संदर्भातील ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.
दरम्यान, आमदार बबनराव लोणीकरणांनी दादासाहेब काळे या महावितरणच्या कर्मचाऱ्याशी बोलताना काही अपशब्दही वापरले. आमदार लोणीकरांच्या घराचे तीन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्याची माहिती होती. त्यामुळे महावितरणने त्यांच्या घराचे मीटर कट केले. हे समजताच बबनराव लोणीकरांनी दादासाहेब काळे या कर्मचाऱ्याला धमकी दिली.
नागरिकांकडून विरोध झाला तर शासकीय कामात अडथळा आल्याचं कारण देत महावितरण संबंधितावर गुन्हा नोंद करते. आता आमदार लोणीकरांनी तर महावितरणच्या कर्मचाऱ्याला थेट धमकीच दिली. यावर महावितरण काय भूमिका घेतंय हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.





