राजस्थानमध्ये कमळ फुलवण्यासाठी मोदींना साकडे; आगामी काळात दौरे वाढणार

जयपूर – राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन पुढे जाणार आहे. राज्यातील निवडणूक प्रचार आता पीएम मोदींच्या देखरेखीखाली करण्याबाबत राज्य भाजपाचा निर्णय झाला आहे. भाजपने निवडणुकीतील राज्यांची कमान चार प्रमुख नेत्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बीएल संतोष हे राजस्थानच्या निवडणुकीचे नियोजन पाहतील. राज्य भाजपाच्या या निर्णयानंतर पंतप्रधानांनी राजस्थानमध्ये सात बैठका घेतल्या आहेत. आता पुढील पूर्वतयारीबाबत ते राज्यातील दोन्ही सभागृहांच्या खासदारांची 8 ऑगस्ट रोजी बैठक होणार आहे.
येत्या काही दिवसांत मोदी तसेच काही ज्येष्ठ आमदार आणि संघटनेच्या सदस्यांचीही बैठक घेतील. 25-26 ऑगस्टच्या सुमारास विद्यमान भाजपा आमदारांची बैठक होऊ शकते. सहसा पंतप्रधान विधानसभा निवडणुकीत सक्रियपणे प्रचार करतात, परंतु निवडणुकीच्या रणनीतीवर थेट लक्ष ठेवत नाहीत.
पण राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्यासह चार मोठे केंद्रीय मंत्री आणि काही स्थानिक नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे बड्या नेत्यांमधील संघर्ष संपवण्यासाठी मोदी स्वतः पुढाकार घेत आहेत. ही निवडणूक पंतप्रधानांचा चेहरा आणि केंद्राच्या योजना आणि रणनीतीवर लढवली जाईल.
हिंदी हार्टलॅंडमधील राजस्थान हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपने 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. पक्षाला 2024 च्या निवडणुकीतही हीच विक्रमी कामगिरी कायम ठेवायची आहे. गेहलोत-पायलट वाद पाहता, यावेळी भाजपाला राज्याची सत्ता काबीज होईल, अशी आशा आहे.
त्यामुळे पंतप्रधान मोदींसह भाजपचे दिग्गज नेते राज्यात सभा घेणार आहेत. ऑगस्टमध्ये पंतप्रधान खरनाल (नागौर), कोटा (हडौती) आणि भरतपूर (ब्रज-मेवात) किंवा जोधपूर (मारवाड) विभागात सभा घेऊ शकतात.





