Asim Munir : “पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी…”; भारताच्या निर्णयाने पाकिस्तान हादरला, असिम मुनीर यांची उघड धमकी
Asim Munir : भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Asim Munir : भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण झाली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानकडून सातत्याने प्रतिक्रिया येत असून, आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी देशाच्या पाण्याच्या कायदेशीर हक्काचे संरक्षण करण्यासाठी “प्रत्येक आवश्यक पाऊल उचलू,” असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, जनरल असिम मुनीर यांच्या अध्यक्षतेखाली २७६ वी कॉर्प्स कमांडर्स परिषद पार पडली. या बैठकीत सरकारच्या निर्देशांनुसार आणि पाकिस्तानच्या जनतेच्या अपेक्षांनुसार, देशाच्या पाण्याच्या वाट्याचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत २४ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (NSC) बैठकीतील निर्णयांनाही पुन्हा दुजोरा देण्यात आला. पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी रोखण्याचा किंवा त्याचा प्रवाह वळवण्याचा कोणताही प्रयत्न हा ‘युद्धजन्य कृत्य’ मानला जाईल, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच देशाच्या सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेत पाकिस्तानच्या सशस्त्र दलांच्या युद्धसज्जतेबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
अफगाणिस्तानबाबतही व्यक्त केली चिंता Asim Munir :
कॉर्प्स कमांडर्स परिषदेत अफगाणिस्तानातील परिस्थितीवरही चर्चा झाली. अफगाण तालिबानच्या नियंत्रणाखालील प्रदेशांचा वापर दहशतवादी संघटनांकडून पाकिस्तानविरोधी कारवायांसाठी होत असल्याची गंभीर चिंता बैठकीत व्यक्त करण्यात आली.
सिंधू पाणी करार का ठरला वादाचा मुद्दा? Asim Munir :
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली. त्यामधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित करणे.
या कराराअंतर्गत सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटप व वापराबाबत दोन्ही देशांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानकडून सातत्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, पाण्याच्या प्रश्नावर दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






